satyaupasak

बीडचा वणवा राज्यभरात पेटणार? वाल्मिक कराड अडचणीत; मुंबईसह प्रत्येक जिल्ह्यात मोर्चाची शक्यता

Sarpanch Santosh Deshmukh Murder Case : बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. मराठा क्रांती मोर्चानेही या घटनेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Beed Crime : बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरून राज्यातील वातावरण तापले आहे. मराठा क्रांती मोर्चाने या घटनेविरोधात संताप व्यक्त केला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मुंबईतील लालबाग येथे मराठा क्रांती मोर्चा मुंबईच्या वतीने मोर्चा आयोजित केला आहे. तसेच, या हत्येच्या प्रकरणात येत्या 28 तारखेला बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार आणि नेते जितेंद्र आव्हाडही सहभागी होणार आहेत. हिवाळी अधिवेशनात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या मुद्द्यावर जितेंद्र आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली होती.

दरम्यान, बीड घटनेच्या निषेधार्थ आज मुंबईतील लालबागमध्ये आंदोलनाला सुरुवात होत आहे. या मोर्च्यातून आंदोलक “वाल्मिक कराड यांना अटक करा” अशी मागणी करत आहेत. बीडमधील मोर्चाच्या आधी प्रत्येक जिल्ह्यात मोर्चे काढले जाणार आहेत. त्यानंतर मुंबईतही मोर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बीडचा वणवा राज्यभरात पसरू शकतो, अशी चर्चा आहे.

बीडच्या घटनेचा वणवा राज्यभरात पसरणार?
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर आरोपींच्या अटकेसाठी राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेमुळे बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि दहशतीचा मुद्दा समोर आला आहे. “बीडचा बिहार होत आहे,” अशा टीकाही व्यक्त होत आहेत. राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्त्यांनीही बीडमधील परिस्थितीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

मंत्री धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते कैलास फड यांचा व्हिडिओ अंजली दमानिया यांनी शेअर केल्याने खळबळ उडाली आहे. बीड पोलिस आता अ‍ॅक्शन मोडमध्ये आले असून हवेत गोळीबार करणाऱ्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल केला आहे.

देशमुखांच्या आत्म्याला शांतीसाठी मारेकऱ्याला फाशीची शिक्षा द्या – बजरंग सोनवणे
दरम्यान, सरपंच संतोष देशमुख यांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी मारेकऱ्याला फाशीची शिक्षा द्यावी, हीच महाराष्ट्राची मागणी असल्याचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी सांगितले आहे. पालकमंत्रिपदाच्या मुद्द्यावर ते म्हणाले की, अजित पवार यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारून या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *